भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो त्याचा फेवरेट सूपला शॉट खेळताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे सूर्यकुमार फिरायला गेला होता आणि चाहत्यांसोबत स्ट्रीट क्रिकेटही खेळला होता. यादरम्यान त्याने चाहत्यांच्या सांगण्यावरून सूपला शॉटही खेळला.
सूर्यकुमार सध्या भारताच्या कसोटी टीमचा भाग आहे. नागपुरातील पहिल्या कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. मात्र, पदार्पणाच्या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. यानंतर श्रेयस अय्यर फिट झाला आणि सूर्यकुमारला संघामधून बाहेर बसावे लागले. तेव्हापासून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार असून या सामन्यातही सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. यानंतर तो आयपीएलमध्ये देखील खेळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव आयपीएलमधील मुंबई संघाकडून खेळतो. मुंबईसाठी शानदार फलंदाजी केल्यानंतर, त्याने भारताच्या टी२० संघात स्थान मिळवले आणि आता तो जगातील पहिल्या क्रमांकाचा टी२० फलंदाज आहे. टी-२० मध्ये अप्रतिम फलंदाजी करूनच त्याने भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान मिळवले आहे. मात्र, तो एकदिवसीय आणि कसोटीमध्ये टी-२० सारखी कामगिरी करू शकला नाही.
४८ टी-२० सामन्यांमध्ये १६७५ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने २० एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ९५३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकमेव कसोटी सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त आठ धावा निघाल्या. सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये १०८ डावात २६४४ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
Surya Bhau spotted playing gully cricket in Mumbai. @surya_14kumar #suryakumaryadav #sky #surya #MIOneFamily #mumbai #IPL #IPL2023 #IPLShoot #MumbaiIndians pic.twitter.com/m2yGQTBNDd
— Mumbai Indians One family (@MIonefamily) March 5, 2023