भारत देश विविधतेने भरलेला देश आहे. इथली फिल्म इंडस्ट्री असो किंवा क्रिकेट इथे प्रत्येक धर्माचे लोक एकत्र येऊन पुढे जातात. तथापि पाकिस्तानमध्ये असे खूपच कमी पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत फक्त दोनच हिंदू क्रिकेट खेळाडू झाले आहेत. यामध्ये अनिल दलपतला फक्त काही निवडक सामनेच खेळायला मिळाले.
दानिश कनेरियाने फक्त ६१ टेस्ट सामन्यांमध्ये २६१ विकेट घेतले. वसीम अकरम, वकार यूनुस आणि इमरान खान नंतर तो सर्वात सफल गोलंदाज आहे. तथापि त्याला फक्त १८ एकदिवसीय सामनेच खेळायला मिळाले. ज्यामध्ये त्याने १५ विकेट घेतल्या.
पाकिस्तानच्या सर्वात सफल टेस्ट गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये चौथा नंबर दानिश कनेरियाचा येतो. दानिश कनेरिया एक हिंदू आहे आणि त्याचे कुटुंब गुजरातमधून पाकिस्तानच्या कराचीमध्ये जाऊन राहिले होते. १९८० मध्ये जन्मलेल्या दानिश कनेरियाने आपले शिक्षण कराचीमध्ये पूर्ण केले.
काही वर्षांपूर्वी शोएब अख्तरने नॅशनल टीव्हीवर खुलासा केला होता की दानिश हिंदू असल्यामुळे त्याच्याशी अनेक खेळाडूंनी भेदभाव केला होता. शोएबच्या या वक्तव्यावर भारतात चांगलाच गदारोळ झाला होता. धर्मांतर करण्यासाठी त्याच्यावर अनेकवेळा दबाव टाकण्यात आला होता, अशी कबुली खुद्द दानिशने दिली आहे.
दानिशवर मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्याच्यासोबत अनेक खेळाडूंवर हे आरोप झाले होते. बंदीनंतर हे खेळाडू मैदानात परतले पण पीसीबीने दानिशला मान्यता दिली नाही.