पन्नासच्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्र नवाथे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. लाखाची गोष्ट, वाहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलविता धनी, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, टिंग्या अशा अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
गेल्या काही वर्षांपासून त्या नातेवाईक असून देखील वृद्धाश्रमात आपले जीवन घालवत होत्या. अभिनेत्री चित्र नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर असे होते. दादर येथील मिरांडा चाळीमध्ये कुसुम आणि त्यांची बहिण कुमुद यांनी १९४५ मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती.
गदिमा यांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. १९५२ मध्ये रिलीज झालेला राजा परांजपे यांचा लाखाची गोष्ट चित्रपटामधून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सोबत त्यांनी लग्न केले होते. बोक्या सातबंडे, अगडबंब सारख्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. टिंग्या हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ज्यामध्ये त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी काम केले होते.