लोकप्रिय लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. मुंबई फणसवाडी येथील त्यांच्या राहत्या घारली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवले.
सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरामध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांच्या कमरेचे हाड मोडले होते, त्यांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती, त्यानंतर त्या अंथरुणाला खिळून होत्या.
भारत सरकारने त्यांना कलाक्षेत्रामध्ये दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीमधील एक बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं यासारख्या त्यांच्या अनेक लावण्या लोकप्रिय झाल्या.
सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना यांनी मराठीसोबत हिंदी, भोजपुरी, गुजराती, तमिळ, पंजाबी भाषांमध्ये देखील गाणी गायली.
सुलोचना चव्हाण यांनी स्वतःला समाजकार्यामध्ये देखील झोकून दिले होते. कार्यक्रमामधून मिळणाऱ्या पैशांमधून ते गरजू लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असत. लावणीची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळेच टिकून राहिली. सध्या त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.