अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील अनेक कलाकारांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा कलाकारांपैकीच एक आहे सिया पाटील. झक मारली बायको केली, कॅश करुनी अॅनश करू, चल गंमत करू, नवरा माझ्या बायकोचा, भागम भाग,अपना सपना बोंबाबोंब, बाप रे बाप,धूम टू धमाल, पक्याभाई यांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन करणारी अभिनेत्री सिया पाटीलने खूप स्ट्रगल करून इंडस्ट्रीमध्ये नाव कमवले आहे. अभिनेत्रीने आता हॉटेल क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री सिया पाटीलने मुंबई येथील चांदिवलीच्या स्टुडिओच्या गाव करी नावाचे नवीन हॉटेल सुरु केले आहे. हॉटेलमध्ये महाराष्ट्रामधील पारंपरिक पदार्थांची चव खवय्यांना चाखता येणार आहे. अभिनेत्रीने हॉटेलचे दोन व्हिडीओ तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

सिया हि मुळची सांगली येथील आहे. सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हे तिचे मूळ गाव आहे. अभिनेत्रीचे पाचवीपर्यंतचे शिक्षण हे गावामध्येच झाले. पुढच्या शिक्षणासाठी ती पुण्याला निघून आली. तिथे तिने कम्प्युटर डिप्लोम पूर्ण केला. विशेष म्हणजे तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळवला आहे.

कॉलेजमध्ये असतानाच तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. यादरम्यान ती काही जाहिरातींमध्ये देखील झळकली. पुढे तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले आणि बघता बघता तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

सिया हि शेतकरी कुटुंबातून आली आहे. तिचे वडील हे द्राक्ष बागायतदार होते. आटीपाडी येथील साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. घरामधून कोणतीही आर्थिक मदत न घेता तिने इथपर्यंत मजल मारली आहे. सिया संध्याकाळी दोन तास पेट्रोलपंपावर आणि फूडवर्डवर अकाऊंटंट म्हणून काम करत होती.