मराठी फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबई येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी फिल्म इंडस्ट्रीला त्यांनी अमुल्य असे योगदान दिले आहे.

त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट, सिरियल्समध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. मोरूची मावशीमधील त्यांची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. या नाटकामुळेच त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये खरी ओळख मिळाली.

गिरगाव येथे वास्तव्यास असलेल्या प्रदीप पटवर्धनांनी कॉलेज वयापासूनच नाटक आणि एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली होती. चतुरस्त्र अभिनेता म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जाते. मराठी चित्रपटामधील देखील त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. त्यांच्या मोरूची मावशी नाटकाचे तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. याशिवाय त्यांनी होल्डिंग बॅक, मेनका उर्वशी, पोलीस लाईन एक पूर्ण सत्य सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.

प्रदीप पटवर्धन यांच्या अचानक निधनामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये त्यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जात असे. त्यांनी अनेक विनोदी भूमिकांमधून देखील दर्शकांचे मनोरंजन केले. अशा या खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत.