दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईमध्ये निधन झाले आहे. सह्याद्री वाहिनीवरून गेली चाळीस वर्षे आपल्या भारदस्त आवाजामध्ये बातम्या सांगणारा बुलंद आवाज आज हरपला आहे. १९७४ ते २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी काम केले. ते ६४ वर्षांचे होते.

ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन प्रदीप भिडे यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी काही काळ नाट्यसंस्थेमध्ये काम केले. जाहिराती, लघुपट यांचा आवाज असणारे प्रदीप भिडे हे सह्याद्री वाहिनीमुळे घराघरामध्ये पोहोचले.

प्रदीप भिडे यांचे आई वडील हे रयत शिक्षण संस्थेसाठी काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळामध्ये सारखी बदली होत असल्यामुळे त्यांचे शिक्षण पाच ते सहा खेडेगावांमध्ये झाले. दहावी केल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आले. प्रदीप भिडे यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

रानडेमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करत असताना मुंबई दूरदर्शन केंद्रावरील उपसंचालक ल. गो. भागवत हे दूरदर्शन विषय शिकवण्यासाठी येत असत. त्यावेळी त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करण्याची इच्छा असल्या सांगावे असे सांगितले होते.

त्यानंतर भिडे हे भागवत यांना भेटले आणि त्यांची प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना बातम्या वाचण्यासाठी दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री त्यांना सांगितले. १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरु झाले आणि १९७४ मध्ये ते वृत्तनिवेदक म्हणून रुजू झाले.

भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेमध्ये त्यांनी काही काळ नाटकांमधून काम देखील केले. नाटकाच्या या पाश्र्वभूमीचा दूरदर्शनवर बातम्या वाचण्यासाठी मोठा फायदा झाल्याचे भिडे सांगायचे. भिडे यांनी हजारहून अधिक जाहिराती, माहितीपटांना आवाज दिला आहे तर दीड ते दोन हजार कार्यक्रमांचं निवेदन त्यांनी केले आहे. भिडे अमिन सयानी यांना आपल्या गुरु स्थानी मानत असत.

प्रदीप भिडे यांनी तेव्हाच्या बातम्या आणि आताच्या बातम्यांवर भाष्य केले होते. ते म्हणाले कि त्यावेळच्या बातम्यांमध्ये आकांडतांडव नव्हता. शांत आणि संयमित बातम्या असायच्या. त्या तुलनेत आजच्या वृत्तवाहिन्या ‘कर्कश’ झाल्या आहेत.