मराठी अभिनेत्री कल्याणी जाधवनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे त्यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्या.
सरफरोश, गांधी, वास्तव सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका खूपच लोकप्रिय ठरल्या होत्या. अभिनेते सुनील शेंडे हे त्यांच्या राहत्या घरामध्ये चक्कर येऊन पडले होते त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांची सून जुईने दिली.
विलेपार्ले येथील राहत्या घरामध्ये त्यांचे निधन झाले. आज दुपारी मुंबई येथी पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी झोटी, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील एक सशक्त अभिनेता म्हणून त्यांची एक विशेष ओळख होती. सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या रुबाबदार आणि खडा आवाजामुळे त्यांच्या पोलीस आणि राजकारणी भूमिका नेहमीच दर्शकांच्या मनामध्ये राहिल्या.
अभिनेता सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांनी ९० च्या दशकामध्ये निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप सोडली. गेल्या अनेक दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर होते.